Tuesday, March 9, 2021

तुम्हाला काय व्हायचं आहे - कट्यार की वाघनखं?

"मी अजून कावळी काळी की गोरी तेच पाहिलेलं नाही..err... गोरी नसावी, कारण इतक्या कावळ्यातला एक तरी आईच्या वळणावर गेला असता..."
आज त्यांना वर्णद्वेषी म्हणाले असते. शेंडी जानव्याचे टोमणे मारून त्यांची सदनापासून ते अग्रलेखापर्यंत धिंड काढली असती. अशा वेळी ते गेले ते बरं झालं असं वाटतं.

आमच्या आधीच्या पिढीला एखाद्याचं पोर काळं आहे असं म्हणणं कधी गैर वाटलं नाही. शाळेतले मास्तर, शेजारच्या काकू, कोपऱ्यावरचा वाणी, शिंपी सगळ्यांनाच रंगावरून एखाद्याला ओळखणे, कधी कधी संबोधणे सुद्धा, ही सामान्य बोली असे. त्यात कधी द्वेष किंवा अपमानास्पद स्वर आले तर मात्र खटके उडायचे.

पण त्यातही कधी "वर्णद्वेषी" अशी संकल्पना मांडली जायची नाही. "तुझ्या बापाचं काय जातं" किंवा "गप्पे, पांढऱ्या!", असले प्रतिउत्तर असायचे. त्या वादाला नसते रूप देऊन त्याचा victim card म्हणून नाही वापऱ्याचे. म्हणून कदाचित लिखाणात देखिल बिंधास्त वापर व्हायचा. 

आज त्या दुर्मिळ धोरणास, 'सहिष्णुता' ह्या नावाने ओळखतात. पण तिची ही ओळख, तिच्या सावत्रार्थी, असहिष्णुता, ह्याने आली. ही व्याख्या कोणी आणि कधी मांडली हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. डाव्या विचारसरणीच्या पुरोगामी विद्वानांनी २०१४ साली मुस्काटात खाऊन घेतल्यानंतर, हे विष कालवलं.

म्हणजे कसं आहे, सहिष्णुता ही व्याख्या आपल्या विचारांमध्ये, आचरणामध्ये दडलेली होती. जिभेला कधी चाटूनही गेली नाही, पण संस्करांच्या आत्म्यासोबत कायम राहिली. उगाच तिचा बाऊ करायची गरज पडली नाही. '१४ साली, त्या संस्कारांची विटंबना म्हणून असहिष्णुता जन्माला आली.

आज असहिष्णुता सात वर्ष मोठी झाली, पण सहिष्णुता गर्भातच मारून टाकण्यात येत आहे. असहिष्णुतेची कट्यार आता वेग वेगळ्या डिझाईन मध्ये येते. कोणी रंगभेद ह्या मातीत ढालतं तर कोणी शेंडी जानव्याच्या धाग्याने विणतो. महाविद्यालयापासून ते विधिमंडळापर्यंत, संस्काराच्या आत्म्यास भोसकण्यात येतं.

शिवरायांच्या थोर नावाचं राजकीय भांडवल करून जो पक्ष औरंगझेबाच्या चाहत्यांशी मिठी मारतो, त्याला अफझल खानाच्या कुशीतही झोप लागेल. "गोब्राह्मण प्रतिपालक" खोडण्यात छत्रपतींचा गौरव होतो असं समजणारे, 'असहिष्णुता किती वाढली', असा प्रचार करत फिरत आहेत. कसले ते स्वराज्य आणि कोण तो हिंदवी.

असो. त्यांच्या मिठीत गुदमरण्यापेक्षा, पुलंनी दिलेल्या वाघनखांनी, पोट फाडून हसण्यात आपला सूड आहे, असं मला वाटतं. त्यांच्या लिखाणाला व्यंग सोडून दुसरं काही म्हणणं म्हणजे, त्यांच्याच शब्दात, "लहान मुलांच्या गाण्याला बालगीत म्हणल्यासारखे आहे". सत्य ते एकच - मी "पुल"कित. 🙏🏼😄


No comments:

Post a Comment